विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मुंबई शहर जिल्हा सज्ज
मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून
राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन
- जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे
मुंबई, दि. 20 - मुंबई शहर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात दिनांक 21 ऑक्टोबर, 2019 रोजी मतदान होणार असून या मतदारसंघात 25 लाख 9 हजार 518 इतके मतदार आहेत. सुलभ मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यात 2592 मतदान केंद्रे आहेत. मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केले. मतदानाच्या तयारी संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी श्री. जोंधळे बोलत होते. यावेळी उपायुक्त (महसूल) सिध्दराम सालीमठ, उपजिल्हाधिकारी व उप जिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम, अपर जिल्हाधिकारी बन्सी गवळी, माध्यम समन्वयक डॉ. राजू पाटोदकर उपस्थित होते. मतदान प्रक्रियेसाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रियेचे कार्य सुरू आहे. निवडणुकीसाठी 21 हजार अधिकारी/कर्मचारी कार्यरत आहेत. तर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दला व केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दल यांचे जवान देखील तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. जोंधळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान केंद्राबाहेरील मतदान रांगेत उभ्या असणाऱ्या मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येईल. तरी सर्व मतदारांनी मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. जोंधळे यांनी केले. 10 मतदार संघात पुरूष 13 लाख 71 हजार 308 आणि, स्त्री 11 लाख 38 हजार 78, दिव्यांग मतदार 2 हजार 457 आणि इतर 132 असे एकुण 25 लाख 9 हजार 518 आहेत. जवळपास 92 टक्के मतदारांपर्यंत मतदार चिठ्ठी (व्होटर स्लिप) पोहचविण्यात आल्या आहेत. काही मतदार वास्तव्य करत असलेल्या ठिकाणी पुर्नविकास प्रकल्प व इतर कारणांमुळे अन्यत्र स्थलांतिरत झाल्यामुळे निर्देशित पत्यावर आढळून आलेली नाहीत. तसेच ज्या मतदारांना मतदान चिठ्ठी मिळाली नसेल त्यांच्यासाठी संबंधित विधानसभा मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मतदार त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना बुथ क्र.,यादी भाग क्र. व अ.क्र. मिळू शकेल. दिव्यांग मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे, यासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील विविध मतदार केंद्रांमध्ये 521 ‘व्हील चेअर्स’चे नियोजन करण्यात आले आहे. तसेच दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांवर येणे व मतदानानंतर घरी परत जाणे सुलभ व्हावे, यासाठी विशेष व्हील चेअर वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई शहर-10 विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवारांची संख्या 178-धारावी (अ.जा.)-11, 179-सायन कोळीवाडा-11, 180-वडाळा-6, 181 माहिम-4, 182-वरळी-13, 183-शिवडी-4, 184-भायखळा-11, 185-मलबार हिल-10, 186- मुंबादेवी-11, 187 कुलाबा-8 असे एकुण 89 उमेदवार आहेत. पोस्टल मत पत्रिकेची माहिती निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी नमुना फॉर्म नं.12, 16 हजार 33 कर्मचाऱ्यांना देण्यात आले त्यापैकी 5 हजार 14 मतपत्रिकेची मागणी प्राप्त झाली तर सैन्य दलातील सैनिकांसाठी ईटीपीबीएसद्वारे 393 मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. सखी मतदान केंद्र मुंबई शहरातील विधानसभा मतदारसंघात 10 सखी मतदान केंद्र आहेत मतदार संघनिहाय सखी मतदान केंद्र धारावी – सखी मतदान केंद्र क्र.111, सायन कोळीवाडा – केंद्र क्र.61, वडाळा– केंद्र क्र. 51, माहिम – केंद्र क्र. 155, वरळी –केंद्र क्र.47, शिवडी – केंद्र क्र. 186, भायखळा– केंद्र क्र.238, मलबार हिल – केंद्र क्र. 133, मुंबादेवी – केंद्र क्र. 2, कुलाबा – केंद्र क्र. 138 या प्रमाणे महिला अधिकारी व कर्मचारी यांचे व्यवस्थापन व नियोजन असलेले प्रत्येक मतदारसंघात एक ‘सखी मतदान केंद्र’ असणार आहे. या सखी मतदान केंद्रावर 1- केंद्रप्रमुख, 3 किंवा 4 निवडणूक कर्मचारी, 1-पोलिस शिपाई अशा पाच ते सहा महिलांचा समावेश असणार आहे मतदान केंद्रांवरील सोयी सुविधांबाबत सर्व मतदान केंद्रावर पुरुष व महिला मतदारांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था, मदत केंद्राची व्यवस्था, प्रथमोपचार, पिण्याचे पाणी व शौचालय या सुविधा तसेच मतदारांच्या मार्गदर्शनासाठी माहिती फलक इत्यादी सुविधा असणार आहेत. मतदान केंद्रांच्या ठिकाणी बाल संगोपन केंद्रांची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदार संघात बॅलेट युनिट 3 हजार 457, कंट्रोल युनिट 3 हजार 457 आणि व्हीव्हीपॅट 3 हजार 376 यापैकी 863 बॅलेट युनिट, 863 कंट्रोल युनिट आणि 782 व्हीव्हीपॅट राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच 178 मतदान केंद्रावर वेबकास्टींग (Live Webcasting) सुविधा तर 91 मतदान केंद्रांवर सुक्ष्म निरिक्षक असणार आहेत. तसेच काही मतदान केंद्रावर पावसामुळे पाणी साचून अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे त्यानुषंगाने मुंबई महानगर पालिकेला फुटपाथ तयार करणे आणि पंपिंग मशिनची व्यवस्था तयार ठेवणे अशा सूचना दिल्या आहेत. आणि वॉटर फ्रुफ मतदान केंद्र स्थापित करण्यात आली आहेत. जिल्ह्यात आचारसहिंता कालावधीत रु. 8.47 कोटींची रोख रक्कम आणि मुद्देमाल जप्त विधानसभा निवडणूक-2019 च्या पार्श्वभूमीवर मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार मुंबई शहर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता अमंलबजावणी काळात निवडणूक भरारी पथकांमार्फत करण्यात आलेल्या 9 प्रकरणांत रु 8.47 कोटींची रक्कम व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यांपैकी 1 अदखल पात्र गुन्हा आहे. तसेच मुंबई शहर जिल्ह्यातील 149 अनधिकृत फलक हटविण्यात आले आहेत. अवैध शस्त्र जप्त मुंबई शहर जिल्ह्यात विविध प्रकरणांत अवैधरित्या शस्त्र बाळगणे आणि बेकायदेशीररित्या शस्त्र विकण्याच्या आरोपात आतापर्यंत परवाना नसलेली शस्त्रे 115 शस्त्र जप्त करण्यात आली असून परवाना धारकांकडून 287 शस्त्र जमा करून घेण्यात आली आहेत. यामध्ये विविध शस्त्रांचा समावेश आहे. मद्यविक्री प्रतिबंध राज्यातील विधानसभा निवडणूक प्रक्रिया खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदानाच्या 48 तास आधी ते मतदान प्रक्रिया संपेपर्यंत तसेच मतमोजणीच्या दिवशी दि. 24 ऑक्टोबर, 2019 रोजी संपूर्ण दिवस मुंबई शहर जिल्ह्यात मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात आली असून हे तीनही दिवस कोरडे दिवस म्हणून पाळण्याचे बंधनकारक आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व घाऊक व किरकोळ अनुज्ञप्तीधारकांना या दरम्यानच्या काळात त्यांच्या अनुज्ञप्ती बंद ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र मुंबई शहर जिल्ह्यातील ज्या अनुज्ञप्ती सदरील आदेशाचे उल्लंघन करून मद्य विक्री करीत असल्याचे आढळून येतील अशा संबंधित अनुज्ञप्तीधारकाची ते धारण करत असलेली अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल त्याचबरोबर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत नमूद तरतुदींन्वये संबंधित अनुज्ञप्तीधारकावर फौजदारी कारवाई देखील करण्यात येईल. आतापर्यंत मद्य जप्त राज्यात लागू असलेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकामार्फत मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदार संघात रु. 5 लाख 29 हजार 987 किंमतीचे अवैध मद्य आणि 5 वाहने जप्त करण्यात आली आहेत. असून आतापर्यंत 63 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मतदान केंद्रात जाताना मतदारांना भ्रमणध्वनी नेण्यास परवानगी नाही मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार मतदान केंद्रात भ्रमणध्वनी संच (Mobile / Cellular Phone) आणण्यास व वापरण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. तरी मुंबई शहर जिल्ह्यात सोमवारी, दि. 21 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या दरम्यान मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी येताना मतदारांनी त्यांच्या सोबत भ्रमणध्वनी आणू नयेत. तरी मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व मतदारांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविण्यासाठी मतदान केंद्रात येताना सोबत भ्रमणध्वनी असणार नाही, याची परिपूर्ण दक्षता घ्यावी. मतदारांना ओळखपत्रासाठी 11 ओळखपत्रांचे पर्याय मतदारांनी सोबत 'वैध मतदार ओळखपत्र' (Electoral Photo ID Card / EPIC) आणणे गरजेचे आहे. सदर ओळखपत्र नसल्यास मा. भारत निवडणूक आयोग यांनी निश्चित केलेल्या 11 प्रकारच्या छायाचित्र ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र मतदानाला जातांना सोबत घेऊन जावे, असे आवाहन मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. जोंधळे यांनी केले. यात मतदाराचे नाव मतदार यादीमध्ये आहे व ज्याच्याकडे वैध मतदार ओळखपत्र (EPIC) आहे अशा मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल. मात्र, वैध मतदार ओळखपत्र नसल्यास मा.भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या 11 ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत आणणे गरजेचे आहे. या 11 ओळखपत्रांमध्ये 1) पारपत्र (पासपोर्ट)2) वाहन चालक परवाना (Driving License) 3) छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (केंद्र / राज्य शासन /सार्वजनिक उपक्रम / सार्वजनिक मर्यादित कंपनीने दिलेले ओळखपत्र) 4) बँक किंवा पोस्ट ऑफिस द्वारे देण्यात आलेले छायाचित्र असलेले पासबुक 5) पॅनकार्ड 6) नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर (NPR) अंतर्गत 'रेसिस्टेंस जीन आइडेंटिफायर' (RGI) द्वारे दिले गेलेले स्मार्टकार्ड 7) मनरेगा कार्यपत्रिका 8) कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड 9) छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज 10) खासदार / आमदार / विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र 11) आधारकार्ड यांचा समावेश आहे.